Spread the love

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

पुणे: राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असणारी पुण्याची ओळख अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

57 व्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवार ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात मिलिंद कुलकर्णी यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ‘राजकारणापलीकडचे मुरली अण्णा’ या शीर्षकाखाली प्रकट मुलाखत घेतली.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले की, मागील काही काळात पुणे शहराचा वेगाने विस्तार झाला. मात्र, भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या वाढ याच्या प्रमाणात नव्या नाट्यगृहांची संख्या वाढली नाही. सध्या शहरात उपलब्ध असलेली नाट्यगृह अपुरी पडत आहेत. त्यामुळे आपण महापौर असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या विस्ताराची योजना आखली होती. या योजनेनुसार बालगंधर्व रंग मंदिराच्या आवारातच बालनाट्य, लोककला, प्रायोगिक नाटक अशा कलाप्रकारांसाठी वेगवेगळी सभागृह उभारली जाणार होती. मात्र दुर्दैवाने करोनाच्या महासाथीत ही योजना मागे पडली.

मात्र याच धर्तीवर बालगंधर्व प्रमाणेच इतर ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे नाट्यगृहांचा विस्तार आणि उपनगरांमध्ये नव्या नाट्यगृहांची उभारणी यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू, असे मोहोळ यांनी सांगितले.

या अनौपचारिक संवादाच्या निमित्ताने मुरलीधर अण्णा यांनी गतकाळाला उजाळा दिला. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण मुळशी तालुक्यातील मुठा या गावी झाले. त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी कुटुंब पुण्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांना बँकेतील नोकरी मिळण्याच्या आधी त्यांनी उसाच्या रसाचे गुऱ्हाळ चालविले. विविध ठिकाणी रसाचे ग्लास पोहोचविण्याचे काम केल्याचे मुरलीधर अण्णा यांनी सांगितले.

आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी देखील आपल्या मुलाने उत्तम कुस्तीगीर व्हावे ही वडिलांची इच्छा होती. त्यामुळे प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन त्यांनी मोहोळ यांना कुस्तीचे प्रशिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण यासाठी कोल्हापूरला पाठवले.

शाहूपुरी तालीम आणि कसबा बावडा येथील शासकीय कुस्ती केंद्र या ठिकाणी मोहोळ यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या स्पर्धा मोहोळ यांनी खेळल्या. आपल्या जडणघडणीत या प्रशिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे मोहोळ नमूद करतात या प्रशिक्षणामुळे संस्कार, खिलाडू वृत्ती आणि संघर्षाची तयारी या गुणांचा विकास झाल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकारण हे सर्वात अनिश्चित क्षेत्र आहे. या क्षेत्रात आपण पुढे कुठे असू, याबद्दल सांगता येणार नाही. मात्र गणेशोत्सवाचा कार्यकर्ता ही आपली भूमिका कायम राहील, असे मोहोळ यांनी सांगितले. गणेशोत्सवाचा कार्यकर्ता याच भूमिकेतून आपण सार्वजनिक क्षेत्रात आलो आणि केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो. राजकारण किंवा समाजकारण करताना संयम, विचारांची बांधिलकी आणि मिळालेली जबाबदारी पार पाडणे या गोष्टी काटेकोरपणे पार पाडल्यास त्याचे फळ निश्चित मिळते, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य एका झटक्यात बदलून गेले. या जबाबदारी मुळे कुटुंबीयांना, मित्रमंडळींना वेळ देऊ शकत नाही. याची खंत मला आणि त्यांना देखील आहे. मात्र या निमित्ताने काम करून दाखवण्याची वेगळी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता चांगले काम करून दाखवायचे आहे, असा निर्धार देखील मोहोळ यांनी व्यक्त केला. आपल्या आई-वडिलांबद्दल त्यांनी कृतज्ञतेचे भाव व्यक्त केले. आपल्या आई-वडिलांनी कष्ट करून आपल्यासाठी पुढच्या गोष्टी सोप्या करून ठेवल्या, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button