Spread the love ‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – गायक स्वरूप भाळवणकर पुणे : मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर यांचे ‘ विठ्ठल नामात होऊनिया दंग’ हे गीत आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित होत आहे. या गीताचे संगीत व गायन स्वरूप भाळवणकर यांनी केले आहे. वारी निमित्ताने आम्ही केवळ गाणे प्रदर्शित करत नसून ‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ या गाण्याचा प्रचार – प्रसार प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार असल्याची माहिती गायक स्वरूप भालवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ झालेल्या पत्रकार परिषदेला स्वरूप भाळवणकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, भाजप कोथरुड दक्षिण विभागाचे सरचिटणीस व उद्योजक गिरीश खत्री, सोनू म्युझिक कंपनीचे संचालक मारुती चव्हाण,नटीने मारली मिठी गीत फेम अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश धिंडले,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गायक व संगीतकार स्वरूप भाळवणकर म्हणाले की, मी मूळचा पंढरपूरचा आहे. घरात कीर्तनाची परंपरा आहे यामुळे लाहानपणांपासून मला भक्ती संगीताची आवड आहे. खरं म्हणजे सध्या मी बॉलिवूड व व्यावसायिक संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे तरीही माझी स्वतःची आवड ही आध्यात्मिक अभंग व किर्तन हेच आहे. मी विठ्ठल नामाचा होऊनिया दंग हे गाणं केलं नाही तर पंढरपूरच्या आषाढी वारी मध्ये सहभागी होऊन या गाण्याचा प्रचार करणार आहे. माझी वैयक्तिक आवड अध्यात्मिक अभंग व कीर्तन हेच आहे. त्यामुळे वेगळ्या आपुलकीने हे गाणे केले आहे. विठ्ठल नामात होऊनिया दंग या गीताचे गायन व संगीत स्वरूप भाळवणकर यांनी केले असून संजना अरुण यांनी त्यांच्यासोबत सह गायन केले आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत काम केलेल्या सचिन धामणकर यांनी या गीतासाठी रिदम अरेंजर म्हणून काम केले आहे. तसेच मिलिंद वानखेडे यांनी या गीतासाठी संगीत संयोजक म्हणून काम केले आहे. स्वरूप भाळवणकर यांनी बालपणापासून आजीच्या मुखातून विठ्ठलनामाच्या ओव्या, अभंग ऐकले. याच पार्श्वभूमीवरून त्यांचं विठोबाशी जडलेलं आत्मीय नातं या गीतात उमटतं. त्यांनी म्हटलेले हे गीत केवळ पार्श्वगायन नाही, तर त्यांच्या हृदयातून उमटलेली भक्तीरसात न्हालेली गाथा आहे – जी दरवर्षी लाखोंच्या पावलांनी पंढरपूरच्या वारीत उतरते. या भक्तिगीतात पारंपरिक भक्तिभाव व आधुनिक संगीताचा सुरेल संगम साधण्यात आला आहे. हे गीत ‘अनेरा एन्टरटेनमेंट ‘ या त्यांच्या मातापित्यांच्या सेवानिवृत्त एसीपी आनंद भाळवणकर व मुख्याध्यापिका अंजली भाळवणकर यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या संस्थेच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे. संस्थेचा उद्देश म्हणजे नवोदित कलाकारांना संधी देणे व अस्सल प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणे हा आहे. स्वरूप भाळवणकर यांनी आजवर हिंदी चित्रपट सृष्टीतील एक रिश्ता, मराठी चित्रपट क्षेत्रातील क्लासमेट शुभमंगल सावधान यासारख्या १५ पेक्षा अधिक हिंदी व मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. बॉलीवूडचे पार्श्वगायक सुदेश भोसले, उस्ताद तौफिक कुरेशी, बली ब्रह्मभट्ट, विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांसारख्या मान्यवरांकडून मार्गदर्शन घेतले आहे. लोकप्रिय गीतकार कुमार हेही त्यांचे मार्गदर्शक आहेत. Post Views: 46 Post navigation गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे वारकऱ्यांना अन्नदान ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्टतर्फे ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी