Spread the love

वेदमूर्ती नटराजशास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंदांचा सहभाग : २१ दिवसांचा महायज्ञ

पुणे : अतिरुद्र यज्ञ केवळ एक धार्मिक विधी नसून, एक सामूहिक आध्यात्मिक जागरण आहे. एक लघुरुद्र म्हणजे ११ ब्रह्मवृंदांनी ११ वेळा रुद्रपठण करणे, असे ११ लघुरुद्र म्हणजे १ महारुद्र आणि ११ महारुद्र म्हणजे १ अतिरुद्र होय. अतिरुद्राच्या या मोठया व्यापकतेमुळे वायुमंडल शुद्धधी होऊन सर्व जीवजंतू दूर होतात व सर्व आजारांपासून मुक्ती मिळते. अशा अतिरुद्र यज्ञाला दगडूशेठ गणपती मंदिरात प्रारंभ झाला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळा च्यावतीने २१ दिवसांचा अतिरुद्र महायाग मंदिरात सुरु झाला आहे. अतिरुद्र याग प्रारंभ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, संगीता रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ज्योती सूर्यवंशी, राजू शेठ सांकला, रंजना सांकला यांच्या शुभहस्ते मंदिरामध्ये झाला.

यामध्ये तब्बल ६५ ब्रह्मवृंद सहभागी झाले असून दि २५ जुलै पर्यंत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ यावेळेत हा महायाग होणार आहे. अतिरुद्र यज्ञ ही केवळ पूजा नसून, एक आध्यात्मिक ऊर्जा प्रक्षेपण आहे. वेदांनुसार, या यज्ञामुळे व्यक्ती, कुटुंब व जग यांच्यात संतुलन व शुद्धता येते. हा यज्ञ जेथे होतो तेथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनुष्यातील चेतनापेशी उर्जित होतात आणि कार्यमग्नता वाढते.

सुनील रासने म्हणाले, यामुळे संपूर्ण समुदाय, गाव, शहर किंवा राष्ट्र स्तरावर अनेक अद््भूत सकारात्मक बदल घडून येतात. दीर्घकाळचे व मानसिक आजारातून मुक्तता, नकारात्मक ऊर्जा दूर होणे, पर्यावरणातील असंतुलन दूर होते, नैसर्गिक आपत्ती कमी होतात आणि संपूर्ण विश्वात शांती व सद्भावना निर्माण होते, हे अतिरुद्र महायज्ञाचे फायदे आहेत. त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरात मागील चार वर्षांपासून हा यज्ञ करण्यात येत आहे.

महेश सूर्यवंशी म्हणाले, अतिरुद्र महायागाचे हे ५ वे वर्ष आहे. मंदिराच्या सभामंडपात भव्य होमकुंड साकारुन हे अतिरुद्र होम करण्यात येत आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री यांसह ६५ ब्रह्मवृंद यामध्ये सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशी महासंकल्प, नांदी श्राद्ध, वैष्णव श्राद्ध, पुण्याह वाचन, महान्यास, गणेश अर्चना, रुद्र जप, गणेश याग, रुद्र होम, नवग्रह होम पार पडला.

पुढील २० दिवसांत दररोज गणपती बाप्पांना ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक व गणेश याग, भगवान शंकरांना रुद्र होम, भगवान सूर्यांना अरुणाप्रश्न होम, देवीला दुर्गा होम, महालक्ष्मी होम, पार्वती स्वयंवर होम, भगवान विष्णूंना महासुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, मेधा दक्षिणा मूर्ती होम याशिवाय सभामंडपात पुरुषसुक्त होम यांसह विविध धार्मिक विधी होणार आहेत. तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button